जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचा महत्वाचा निर्णय
- राज्यातील पहिला निर्णय
चंद्रपूर,
कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे कोणत्याही घर मालकाने भाडेकरूंना घर खाली करायला सांगू नये. तसेच एक महिन्याचे घरभाडे सध्या घेऊ नये, असा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आज घेतला. यामुळे आर्थिक अडचणीला समोर जाणाऱ्या गरीब भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, राज्यात पहिल्यांदाच कुठल्या जिल्ह्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. वीज निर्मिती केंद्र, कोळसा खाणी, सिमेंट, पोलाद कारखाने असे अनेक मोठे उद्योग इथे आहेत, त्यामूळे येथे कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहेत. तसेच इतर जिल्हा, राज्यातून आलेला मजूर वर्ग देखील येथे आहे. सध्या कोरोनामुळे संपूर्ण जिल्हा ठप्प झाला असून अशा वर्गाचा रोजगार देखील बुडाला आहे. त्यामूळे त्याच्या समोर जीवन जगण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातही हा वर्ग मोठ्या प्रमाणात भाड्याच्या खोलीत राहतो. जवळ पैसाच नाही तर घरभाडे द्यावे कुठून हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तसेच चंद्रपूर शहरात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जमावबंदी असल्याने सारे व्यवहार ठप्प आहेत. अशावेळी त्यांच्यासमोर देखील घरभाडे कसे द्यावे हा प्रश्न होता. ही समस्या जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांच्या लक्षात येताच त्यांनी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले. अशा वर्गातील भाडेकरूंकडून कुठलेही भाडे घेऊ नये आणि त्यांना घर खाली करायला सांगू नये असे निर्देश डॉ. खेमणार यांनी दिले. अशाच पद्धतीचा निर्णय उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात घेण्यात आला आहे. मात्र राज्यात अशा प्रकारचा पहिल्यांदाच निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे कामगार आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.