शेतकर्यानी अवलंब करावा हवामान आधारित कृषी सल्ला

शेतक-यांनी अवलंब करावा

हवामान आधारित कृषी सल्ला‌


चंद्रपूर,दि. 10 एप्रिल: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी हवामान आधारित कृषी सल्ला दिला जातो.याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

हा आहे हवामान आधारित कृषी सल्ला:

सामान्य सल्ला- हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 ते 12 एप्रिल 2020 रोजी तुरळक ठिकाणी खुप हलका पाउस पडण्याची शक्यता आहे.तरी पक्व झालेली पिके गहू, हरभरा, इत्यादीची काढणी करून घ्यावी तसेच काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. अवेळीचा पाऊसा पासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवावे.

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून रक्षण:

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला मास्क लावावे. शेतात काम करताना लोकांमध्ये संपर्क टाळण्यासाठी 3 ते 5 फूट अंतर ठेवावे. समुदायामध्ये एकत्र येऊ नका. हात वारंवार साबणाने धुवुन सॅनिटायझर वापरावे. शिंकताना व खोकलतांना तोंडावर रूमाल धरावे व स्वच्छता राखावी.

रब्बी पिके- जमिनीची पूर्वमशागत:

काढणी,मळणी झालेल्या पिकांच्या शेतात मागील आठवड्यात झालेल्या हलक्या पाऊसाचा,ओलाव्याचा फायदा घेत शेतीची ताबडतोब नांगरणी करावी.

उन्हाळी धान-लोंबी अवस्था:

उन्हाळी धान पिकामध्ये लोंबी येण्याच्या सुरुवातीस नत्राचा तिसरा हप्ता 25 टक्के (54किलो) युरिया प्रति हेक्टरी द्यावे, खते दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावे. पिक लोंबी येण्याच्या अवस्थेत असतांना 3 ते 5 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. उन्हाळी धान पिकामध्ये खोडकिडीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत.धान शेतात खोडकिडीचे 5 टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच. ऐसिफेट 75 टक्के डब्लूपी 20 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी मुंग - वाढीची अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता मुंग पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलित करावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 2 ते 3 खुरपण्या देऊन व निंदन करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक 1 महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

उन्हाळी भेंडी- फुल अवस्था:

तापमानाची वाढ लक्षात घेता भेंडी पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलित करावे. भेंडी फळ पोखरणा-या अळीचे नियंत्रणासाठी क्विनालफॉस 25 टक्के ईसी 20 मिली अथवा नोव्हेलिरॉन 10 टक्के ईसी 15 मिली अथवा क्लोरट्रेनिलीपोल 18.5 टक्के एससी 3 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. रस शोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमिथेझाम 25 टक्के विद्राव्य दाणेदार 2 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टरबूज व खरबूज- फळ धारणा अवस्था:

पक्वतेनुसार टरबुज पिकांच्या फळांची तोडणी करावी. फळे काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करावीत रोगट, किडलेली, फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळे ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावेत.

आंबा- फळ धारणा अवस्था:

आंबा पिकावरील फळगळ कमी करणेसाठी 20 पीपीएम (1ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) नॅपथॅलीक ऍसिडिक ऍसिड (एनएए) संजीवकाचे द्रावण मोहरावर फवारावे.

शेतक-यांनी या सुचनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.