जिल्हयात ९९टक्के नियमित धान्य वाटप

जिल्ह्यात 99 टक्के नियमित धान्य वाटप

Ø केशरी शिधापत्रिका धारकांना 390 क्विंटल अन्नधान्य वाटप

Ø शिवभोजन योजनेअंतर्गत 2738 थाली वाटप

Ø जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Ø इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन मध्ये 110 नागरिक

Ø 247 प्रकरणात 13 लाखांवर दंड वसूल


चंद्रपूर, दि.26 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप या काळात पूर्ण झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित अन्नधान्य वाटप 99 टक्के पूर्ण झाले आहे. तर वरील योजनेतील नागरिकांना मानसी पाच किलो तांदूळ वाटपाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 17 लाख लोकांना अन्नधान्याचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 3 लक्ष 93 हजार 656 कार्डधारक असून जवळपास 17 लाख लोकांपर्यंत शासकीय अन्नधान्य पुरवठा वितरण व्यवस्थेतून हे वितरण केले जाते. या सर्व नागरिकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप पूर्ण झाले आहे.

दरम्यान, राज्यशासनाच्या शिव भोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 16 ठिकाणी असाह्य ,विमनस्क, निराधार ,बेघर लोकांना तयार अन्नाचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यामध्ये चांगले अन्न देण्याबाबत शिव भोजन देणाऱ्या कंत्राटदारांना बजावण्यात आले असून तक्रार आल्यास कार्यवाही करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या चंद्रपूर येथे 6, वरोरा 2, भद्रावती बल्लारपूर मुल गोंडपिंपरी राजुरा सावली चिमूर ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक एक असे एकूण 16 केंद्र आहेत. या ठिकाणावरून जवळपास 3 हजार थाळी केवळ 5 रुपये किमतीमध्ये दिल्या जाते.

जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 110 आहे.कोरोना संसर्ग संशयित म्हणून 96 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  88  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 165 आहे. यापैकी 2 हजार 610 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 555 आहे.

नियमांचे पालन न झाल्यास होणार कारवाई:

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 247प्रकरणात  एकूण 13 लाख 37 हजार 70 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 749 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

 

 

चंद्रपूर जिल्ह्यातील संपर्कासाठी अधिकृत दूरध्वनी क्रमांक:

जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचनजेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी  07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.