औषधांची दुकाने वगळता किराणा दुकाने ३वाजेपर्यत सुरू

आजपासून सर्व नागरिकांनी कापडी मास्क वापरावा : जिल्हाधिकारी खेमनार
मेडिकल वगळता किराणा दुकाने फक्त 3 वाजेपर्यत सुरु राहतील

Ø नागपूर, यवतमाळ, गोंदीया जिल्हयाशी संपर्क नाही

Ø जिल्ह्याच्या व राज्याच्या सर्व सीमा सील बंद

Ø जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Ø जिल्हा प्रशासनाने बँक ऑफ इंडियात खाते उघडले ; मदतीचे आवाहन

Ø रस्त्यावर विनाकारण दिसाल तर पोलीस कारवाई होईल

Ø आज पासून सक्तीमध्ये वाढ ;जीवनावश्यक दुकाने 3 पर्यत

Ø औषधी दुकाने व घरपोच पार्सल सेवा देणाऱ्या हॉटेलची किचन उघडी

Ø अनावश्यक फिरणाऱ्या 91 नागरिकांवर पोलीस कारवाई

Ø 180 वाहने पोलिसांकडून जप्त ; खरेदीसाठी पायी निघा

Ø बँकेतील व्यवहार शक्य असेल तर पुढे ढकलण्याचे आवाहन

Ø जिल्ह्यातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या लोकांची माहिती प्रशासनाला द्या

Ø शेवटचे 10 दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Ø चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची अपेक्षा


चंद्रपूर, दि.6 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह कोरोना ग्रस्त रुग्ण नाही. त्यामुळे लगतच्या सर्व जिल्हा सीमा कडेकोट सीलबंद करण्यात येत आहे. 14 एप्रिल पर्यंत आता रस्त्यावरील गर्दी अतिशय कमी झाली पाहिजे. यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील दुपारी फक्त 3 पर्यंत उघडी ठेवली जातील. रस्त्यावर दिसणाऱ्यांना आता सक्तीने पोलिस ताब्यात घेतील. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.

          चंद्रपूर व जिल्ह्यातील अन्य शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी 14 एप्रिल पर्यंत आता घराबाहेर निघणे पूर्णतः बंद करावे. नागरिक घराबाहेर पडूच नाही. या पद्धतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कोरोना आजाराचा झपाट्याने राज्यात व जगात प्रसार वाढत आहे. आता या आजाराचा गुणाकार सुरू झाला असून पुढील काही दिवस अतिशय जबाबदारीने वागण्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

            आरोग्य विभागाकडून आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता सर्व नागरिकांनी कापडापासून तयार करण्यात आलेले साधे मास्क वापरणे अनिवार्य आहे. उदयापासून याचा वापर करावा.

            दरम्यान जिल्हयात होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या 203 असून केवळ 1 रुग्ण 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईनमध्ये आहे. 15 रुग्णांपैकी 13 रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव निघाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा सध्या कोरोना आजारापासून मुक्त आहे.मात्र यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने सामाजिक दुरीता राखणे गरजेचे आहे. याशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघाले त्या जिल्ह्यामधील नागरिक या जिल्ह्यात येणार नाही व या जिल्ह्यातील नागरिक त्या जिल्ह्यांमध्ये जाणार नाही याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शहर असो वा गावे नागरिकांनी स्वतःहून प्रत्येकाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            रस्त्यावर दुचाकींची संख्या हळूहळू वाढायला लागल्यामुळे उद्यापासून जीवनावश्यक वस्तूची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. अनावश्यकपणे फिरणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात 180 वाहने जप्त करण्यात आली असून 91 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरता कामा नये,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

            ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजना अंतर्गत बँकेमध्ये पैसे जमा करण्यात आले आहे. त्यामुळे गर्दी न करता या सेवेचा लाभ घ्यावा. आवश्यकता नसेल तर बँकेचे व्यवहार पुढील काही दिवस टाळावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

            कोरोना आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी  मोठ्या प्रमाणात आर्थिक  मदत आवश्यक आहे. मुख्यमंत्री सहायता निधी प्रमाणेच आज जिल्ह्यासाठी सहाय्यता कोष निर्माण करण्यात आला आहे. कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आले आहे. खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सढळ हस्ते या  बँक खात्यामध्ये कोरोना संदर्भात लढण्यास जिल्हा प्रशासनाला मदत करावी,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील निवारा कक्षामध्ये 5 हजाराच्या आसपास नागरिक असून त्यांच्या खान -पानापासून आरोग्य पर्यंत सर्व काळजी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना अन्नधान्याचे वितरण नही सुलभ पद्धतीने जिल्ह्यात सुरू झाले आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असून भाजी बाजारांमध्ये कोणत्याही परिस्थितीत सामाजिक दुरीत्व राखून सामान खरेदी करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बेघर ,निराश्रित नागरिकांना जेवण देण्यासाठी शिव भोजन योजना कार्यान्वित असून महानगरपालिके मार्फत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भोजनदान सुरू असून त्याचा लाभ त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

            ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी त्यांच्या पैशातून घरपोच अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. त्याचा लाभ घ्यावा व आवश्यक दूरध्वनी करावे.तसेच शहरातील सर्व हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी जेवणावळी चालणार नाहीत. फक्त किचन सुरू असेल. सर्व पार्सल सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.