सध्याच्या परिस्थितीमध्ये एएनएम,आशा व अंगणवाडी सेविकांना
प्रशिक्षण पुस्तिका मार्गदर्शक ठरणार : ना. विजय वडेट्टीवार
कोरोना विषाणू संसर्ग रोखणाऱ्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन
कोविड-19 उपयोजना आणि संसर्ग प्रशिक्षण पुस्तिका एएनएम,आशा व अंगणवाडी सेविकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी याठिकाणी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,आयुक्त राजेश मोहिते हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच नागरिक घरामध्ये आहेत.परंतु, या नागरिकांचा आरोग्यविषयक सर्वे एएनएम,आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करत आहे. तसेच कोविड-19 संदर्भात उपाययोजना आणि संसर्ग याबाबत माहिती व्हावी या विषयाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर मार्फत प्रशिक्षण पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण पुस्तिकेमध्ये कोरोना (कोविड-19) विषाणू संदर्भात सविस्तर माहिती तसेच एएनएम, आशा व अंगणवाडी सेवकांची भूमिका याविषयीची सविस्तर कार्यपद्धती विषद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये एनएनएम,आशा व अंगणवाडी सेविकांना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे.