प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत ५ किलो तांदूळ वाटप शुभारंभ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
मोफत 5 किलो तांदूळ वाटपाचा शुभारंभ
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशनकार्ड धारकांना मिळणार लाभ


चंद्रपूर,दि.3 एप्रिल: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. या काळामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना 5 किलो तांदूळ मोफत वाटपाचा शुभारंभ जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांच्या हस्ते महाकाली वार्ड चंद्रपूर येथे संतोष लहामगे यांच्या रास्तभाव दुकानात दिनांक 3 एप्रिल रोजी करण्यात आला.

यावेळी पुरवठा निरीक्षक उत्कर्षा पाटील, तांत्रिक सहाय्यक अमित दानव तसेच रास्त भाव दुकानदार संतोष लहामगे उपस्थित होते.अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांनी यावेळी लाभ घेतला.

एप्रिल,मे,जून या 3 महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. हे धान्य वाटप पात्र लाभार्थी म्हणजेच ज्यांच्याकडे अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका आहे अशा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्याचे धान्य वितरित झाल्यानंतरच माहे एप्रिल 2020 मध्ये पात्र लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत वाटप होणार आहे.

जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशा शिधापत्रिकाधारकांना मोफत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ वाटप केल्या जाईल. याची सर्व शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी. अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांना सुद्धा त्यांचे शिधापत्रिकेत जेवढ्या व्यक्ती समाविष्ट आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो तांदूळ दिले जाईल.

ही योजना माहे एप्रिल,मे व जून 2020 या 3 महिन्यापूर्तीच मर्यादित राहील. त्यामुळे घाई करू नये. लाभार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव दुकानातूनच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कायदा 1897दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागू केलेला असुन त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हयात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश काढण्यात आलेला आहे. शिधापत्रिका धारकांनी रास्तभाव दुकानातुन धान्य घेतेवेळी दुकानात एका वेळेस 2 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.