भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आबेडकरांनी दाखवलेल्या समतेच्या वाटेवर चालणं अपेक्षित:- ना.विजय वडेट्टीवार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या

समतेच्या वाटेवर चालणं अपेक्षित : ना.विजय वडेट्टीवार

ना.विजय वडेट्टीवारांचे घरातच महामानवाला अभिवादन


चंद्रपूर,दि.14 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुटूंबियांसमवेत नागपूर येथील निवासस्थानी महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी केली. यावेळी श्रीमती किरण वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, सुनीत ठक्कर, राजू धोटे, बाळा पालकर आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाच्या 14 एप्रिल रोजीची जयंती ही 129 वी जयंती. पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळ्यांवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच कार्य अजोड आहे. दलित, वंचित, बहुजन, पीडित आदिवासी, व मागास प्रवर्गातील व्यक्तींना आज समाजात जे स्थान आहे त्याचे पूर्ण श्रेय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारतीय समाजाचे प्रगतीशील दिशादर्शक, मानवजातीचे उद्धारक, बहुजननायक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. बाबासाहेबांनी कोणा एका धर्मासाठी, कोणा एका जातीसाठी नव्हे तर मानवतावादी दृष्टीकोन ठेवून सर्व मानवजातीच्या उत्थानाकरिता संपूर्ण जीवनाचा त्याग केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, आणि मानवता या मूल्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. जात , धर्म, पंथ , लिंग असा भेदभाव नकरता त्यांनी दाखवलेल्या समतेच्या वाटेवर चालणं अपेक्षित असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एरवी धुमधडाक्यात साजरी होते. परंतु, यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे जयंतीवर मर्यादा आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. रस्त्यावरील वाहतूकही थाबविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. असे म्हणतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घरीच अभिवादन करून जयंती साजरी करा असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी कुटूंबियांसमवेत नागपूर येथील निवासस्थानी महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घरीच अभिवादन केले.

पुढे ते म्हणाले, परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ते आणि समाज सुधारकही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टाने विद्या मिळविली आणि केवळ पदवी घेण्यापुरता त्यांचा विद्येशी संबंध नव्हता. ते प्रकांडपंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेले लिखाण व त्यांची भाषणे याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण सर्व समाजाने लक्षात घ्यावयास हवा. आज आपण सर्व त्यांना अभिवादन करुया. सर्वानी घरीच प्रतिमेला हार घालून बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून जयंती साजरी करू.