सिंदेवाही : वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभाग सिंदेवाही सावली अंतर्गत प्लॅटेशन(रोपवन) चे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर मजूर कार्यरत असून या मजुरांची मजुरी थेट बँकेत जमा होण्याचे प्रावधान आहे. परंतु मजुरांच्या बँकेत जमा झालेली रक्कम काढायला लावून आपले कमिशन घेतल्याच्या आरोप सिंदेवाही चे वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिनेने यांनी केल्याचे प्रकरण उजेडात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातंर्गत स्थानिक मजुरांकरवी प्लॅंटेशन(रोपवन) चे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मजुरांची मजुरी देण्यासाठी त्यांचे बँकेचे अकाउंट नंबर जोडण्यात आले. थेट मजुरांच्या खात्यात ही मजुरी जमा करण्यात आली. ५ हजारांपासून तर ५० हजारांपर्यंत ची मजुरी या कामाची मजुरांना त्यांच्या बँक खात्यात मिळाली. परंतु आश्चर्य म्हणजे सिंदेवाही सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे अधिकारी डी. आर. आडकिने यांनी मजुरांना त्यांची मजुरी बँकेतून काढून आपले कमिशन घेऊन नंतर त्या मजुरांना ते पैसे देण्यात आले असल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे. मजुरांच्या मते त्यांची वन मजुरी त्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर ती काढून वन अधिकाऱ्यांना देण्याची कोणतीही तरतूद नसताना वन अधिकारी आडकिने यासाठी मजुरांवर दबाव आणत असून त्यांच्या दबावात मजुरांनी जमा झालेली वन मजुरी काढून कमिशन अडकिने यांना दिल्याचे वृत्त आहे.इतकेच नव्हे तर वनाधिकारी यांनी आपल्या कार्यालयामार्फत एका मजुराला रक्कम काढून न दिल्याने त्यांच्यावर कार्यालयीन कारवाई करण्याचे पत्रसुध्दा दिल्याने मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अडकिने यांना वारंवार फोन करूनही त्यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता मजुरांकडून होत आहे.