CSTPS च्या मुजोर धोरणाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांची "विरूगिरी" !



चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CSTPS)  चंद्रपूर येथील वीज केंद्रातील जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास विलंब होत असल्याने आज बुधवार दि. 5 अॉगस्ट रोजी आठ जण विज निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये संच क्रमांक 9 याठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी  वीज केंद्रातील बायलर वरती चढून विरूगिरी केली.  यात पाच पुरुष व तीन महिला यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,  चंद्रपूर वीज केंद्रासाठी या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबियातील एखादाला स्थायी स्वरूपात नोकरी देण्याचा करार विज निर्माण कंपनीने प्रकल्पग्रस्तांसोबत केला होता,  मात्र अनेक वर्षे उलटूनही नोकर्‍या देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे संतप्त झालेले प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी यापूर्वी अनेकदा निवेदने, मोर्चे आंदोलने केली, फक्त आश्वासनाव्यतिरिक्त प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची कुठलीच दखल घेतली नसल्यामुळे आज त्यांनी बाष्पीभवन होणाऱ्या चिमणीवर चढून आंदोलन करावे लागले.
महत्वाचे म्हणजे आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारला असून या एल्गारामध्ये पुरुषांच्या सोबत महिलांचा ही समावेश होता. CSTPS प्रशासनाचे अडेलतट्टू धोरण, प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हारी लागल्यामुळे हे पाऊल त्यांना उचलावे लागले असल्याचे सांगितल्या जात आहे.
आज कोरोनाच्या संकटामुळे समस्त देश मेटाकुटीला आला आहे. सामान्यांच्या रास्त मागणीला ही प्रशासनाने केराची टोपली दाखवली त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांना टॉवरवर चढून आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली. प्रकल्पग्रस्तांनी आज विरूगिरी करत बायलर वर चढून आंदोलन केले. हा संपूर्ण परिसर सीआरपीएफ यांच्या देखरेखीखाली येतो. तरीसुद्धा प्रकल्पग्रस्त हे टावरवर चढून आंदोलन करतात, याचाच अर्थ हा विषय गंभीर असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन चे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत असल्याची सांगण्यात येत आहे.