चंद्रपूर जिल्हयात जनावरांमध्ये लिम्पी या त्वचेच्या रोगाची लागण झाल्यामुळे जिल्हयात लसीकरण व औषधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा व जिल्हयातील पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये डॉक्टर्सची रिक्त असलेली पदे प्रतिनियुक्तीने तातडीने भरण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पशुसंवर्धन मंत्री ना. सुनिल केदार यांच्याकडे केली. या विषयासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी आज ना. सुनिल केदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. चंद्रपूर जिल्हयात पशुवैद्यकिय चिकीत्सकांची काही रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील व लस, औषधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन ना. सुनिल केदार यांनी या चर्चेदरम्यान दिले.
चंद्रपूर जिल्हयात सध्या जनावरांमध्ये लिम्पी या त्वचेच्या रोगाची लागण झाली आहे. जिल्हयात सुमारे 49280 जनावरे या रोगाने बाधीत आहेत. जिल्हयात 155 पशुवैद्यकिय दवाखाने असून या दवाखान्यांमध्ये 111 पशुवैद्यकिय चिकीत्सक कार्यरत आहे. पशुवैद्यकिय चिकीत्सकांच्या 44 जागा रिक्त असल्यामुळे या रोगावर प्रतिबंध घालण्याच्या प्रक्रियेत अवरोध निर्माण झाला आहे. त्यामुळे काही रिक्त जागांवर प्रतिनियुक्तीने पशुवैद्यकिय चिकीत्सक उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले. बाधीत जनावरांवर आवश्यक औषधोपचार होत नसल्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहे. बाधीत नसलेल्या जनावरांना लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात येणा-या शिबीरांची संख्या सुध्दा कमी आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक बाधीत गावात शिबीरांचे आयोजन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली. चंद्रपूर जिल्हयातील जनावरांवर उदभवलेल्या लिम्पी स्कीन डिसीजवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही ना. सुनिल केदार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिली.