जिल्‍हयातील माफीयाराज संपवावे व गुन्‍हेगारीवर आळा घालावा



चंद्रपूर जिल्‍हयात मोठया प्रमाणावर गुन्‍हेगारीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असुन अवैध व्‍यवसायांना सुध्‍दा उत आलेला आहे. या जिल्‍हयात माफीयाराज निर्माण झाले असुन वेळीच यावर आळा न घातल्‍यास जिल्‍हयात अराजक निर्माण होईल. हा धोका लक्षात घेता तातडीने यावर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने पोलिस अधिक्षक श्री. अरविंद साळवे यांना निवेदन सादर केले.
भाजपाच्‍या शिष्‍ट मंडळाने पोलिस अधिक्षक श्री. अरविंद साळवे यांचे भाजपातर्फे स्‍वागत करत त्‍यांच्‍या यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी पोलिस अधिक्षकांशी चर्चा करत देवराव भोंगळे म्‍हणाले, दि. 8 ऑगस्‍ट रोजी बल्‍लारपुर शहरात गँगवारची घटना घडली असुन यात एका व्‍यक्‍तीवर नकाबधारी समुहाने गोळीबार केला. नागभीड येथे एका अल्‍पवयीन मुलीवर सामुहीक अत्‍याचार झाल्‍यामुळे तिने आत्‍महत्‍या केली. ही आत्‍महत्‍या नसून हत्‍याच आहे. दारुची मोठया प्रमाणावर तस्‍करी जिल्‍हयात सुरु आहे. वाळू तस्‍करी सुध्‍दा जोरात सुरू आहे. काल मनोज अधिकारी यांची निर्घृण हत्‍या झाली. गेल्‍या आठ दिवसात जिल्‍हयात खुनाच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध व्‍यवसायांच्‍या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्‍हयात नागरीक असुरक्षित आहेत. विशेषतः महिला व मुलींच्‍या सुरक्षिततेसमोर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न जिल्‍हयात निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत आहे. यावर वेळीच प्रतिबंध घालणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात वेळोवेळी पोलिस प्रशासनाला अवगत करूनही त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात त्‍वरीत प्रतिबंधात्‍मक कार्यवाही न केल्‍यास जनआंदोलन छेडण्‍याचा ईशारा देवराव भोंगळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या शिष्‍टमंडळात देवराव भोंगळे यांच्‍यासह चंद्रपूर महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपातील भाजपा गटनेते वसंत देशमुख यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.