यार मतदार तुझे....! 'दारू' चाहिये की 'डॉक्टर' चाहिये...! जिने के लिये 'डॉक्टर' चाहिये और नशे के लिये 'दारू' चाहिये...!!



सन १९७७ ला राजेश खन्ना, जिनत अमान अभिनीत 'छैला बाबु' या चित्रपटातील 'यार दिलदार तुझे क्या चाहिये ? 'प्यार' चाहिये की 'पैसा' चाहिये!' लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले व किशोर कुमार व आशा भोसले या जोडीने गायलेले गाने त्याकाळी फार सुपरहिट झाले होते, अत्यंत श्रवणिय असलेल्या या गीताचे बोल जिल्ह्यातील आज च्या परिस्थितीत ‘यार मतदार... तुझे क्या चाहिये! 'दारू' चाहिये की 'डॉक्टर' चाहिये !' अशी टॅग लाईन देऊन जनतेस विचारले तर बहुतेक मतदारराजांचे उत्तर हे ‘डॉक्टर'चं असेल यात संशय नाही. संपूर्ण जग 'कोरोना' शी लढत असतांना चंद्रपूर जिल्हाही त्यात अग्रेसर राहिला. परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या सोई-सुविधा उपलब्ध व्हायल्या हव्या होत्या, त्या पुरेस्या व समाधानकारक नसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित रूग्ण व मृतकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र पार ढेपाळली आहे. आरोग्य यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, ही बाब आज जिल्ह्यात हमखास बघायला मिळत आहे. डॉक्टरांचा तुटवडा, अपुरी बेड ची सुविधा, खाजगी डॉक्टरांनी चालविलेली आर्थिक लुट अशा एक ना अनेक समस्या 'कोरोना' परिस्थितीमध्ये जिल्ह्यात बघायला मिळत आहे. सामान्यजनांना 'अन्न-वस्त्र-निवारा' पुरविण्याची जबाबदारी शासनाची असते याचाच विसर बहुतेक शासनाला पडलेला दिसत आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या दरबारात जाऊन एका-एका मतांचा जोगवा मागीतला व मतदारांनी आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांना पवित्र विधानसभेत पाठविले, आपण 'पालक' असल्याची जाणिव ते आज विसरले आहेत, असे दिसू लागले. चंद्रपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधित रूग्णांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर ही येणाऱ्या काही महिन्यात बाधित रूग्णांची मोठी वाढ होणार असल्याचे नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले आहे. त्यावर उपाय शोधण्याचे सोडून 'पालकमंत्र्याची' 'दारूबंदी हटविण्यासाठी होत असलेली कसरत बघितली तर काही गोष्टीला नाकारता येत नाही. जिल्ह्यात शेवटच्या तबक्यातील गरिबाला आज अन्नासाठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊन, जनता कर्फ्यु यामुळे हवालदिल झालेले मध्यम वर्ग कुटुंबिय “पोटासाठी करू की जिव वाचवू" या विवंचनेत सापडला आहे. बेरोजगारी आज सगळ्यांच्याच दारावर आवासून उभी आहे. 'कोरोना' च्या भयावह स्थितीमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या सामान्यजनांना निःशुल्क आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा 'दारूबंदी' कशी काय हटविण्यात येईल? यासाठी पालकमंत्र्यांची सुरू असलेली केविलवाणी धडपड बघून ‘इसमे कुछ तो गडबड है 'दया' !' हे न समजण्याइतकी चंद्रपूर जिल्ह्यातील जनता मुर्ख नाही. जिल्ह्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी, घडत असलेले हत्यासत्र, रेती-दारू तस्करांची अमर्याद वाढलेली साखळी या चिंताजनक बाबी आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेत, तेच 'मुक्के व बहिरे' झाल्याचे सोंग घेतांना दिसत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात न्याय मिळावा म्हणून सात दिवस प्रकल्पग्रस्तांनी महिलांसोबत उंच चिमणीवरून चढून आंदोलन केले, त्या
आंदोलनकर्त्यांकडे मरणावस्थ होईपर्यंत लक्ष न देणारे सत्ताधारी, विजेचे भरमसाठ बिल कसे भरायचे या कोंडीत सापडलेल्या मतदार-राजाला दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडण्यापेक्षा याच आश्वासनावर विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार महोदय आज जनतेपासून आपले तोंड लपवित आहे. ही जनतेच्या प्रतिनिधींची नैराश्यपूर्ण भूमिका मतदारांसाठी न विसरणारी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 'दारूबंदी' हा सुरूवातीपासूनचं विरोधाचा व राजकारणाचा भाग राजकारण्यांनी बनवून ठेवला आहे. आता दिलेला 'शब्द' पाळायचा ? म्हणून 'डॉक्टर' पेक्षा 'दारू' ला महत्व दिले जात आहे. स्वार्थी राजकारणाची ही 'खेळी' जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांना समजली आहे. जिने के लिये डॉक्टर' चाहिये और नशे के लिये 'दारू' चाहिये...! ही घडी 'डॉक्टर' मागण्याचीचं आहे, हे आता या स्वार्थी 'छैला बाबूं'ना सांगायची वेळ आली आहे.