नागपूर. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून जात पुढे करून समाजातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणतेही कर्तृत्व नसलेल्यांकडून स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी समोरच्या उमेदवाराची जात काढण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. मतदारसंघातील जाणकार, सुशिक्षित पदवीधर मतदारांनी आपला प्रतिनिधी निवडताना उमेदवारांचे कार्य, त्याचे कर्तृत्व या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पाहूनच नेतृत्व सोपवावे, असे आवाहन राज्यसभा सदस्य डॉ.विकास महात्मे यांनी केले.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांची गुरूवारी (ता.२६) नागपूर शहरात विविध ठिकाणी संपर्क सभा झाली. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने मानेवाडा मार्गावरील स्वाती लॉन येथे झालेल्या सभेमध्ये खासदार डॉ.विकास महात्मे बोलत होते.
सभेमध्ये दक्षिण नागपूर प्रभाग प्रमुख देवेंद्र दस्तुरे, नगरसेविका मंगला खेकरे, नगरसेवक नागेश मानकर, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, धनगर समाज संघर्ष समितीचे उपाध्यक्ष महादेवराव पातोंडे, गिरीश देशमुख, वंदना बर्डे यांच्यासह बहुसंख्य धनगर समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी धनगर समाज संघर्ष समिती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीतर्फे संदीप जोशी यांना समर्थन दर्शविण्यात आले. याशिवाय माजी सैनिक आघाडीतर्फेही माजी सैनिकांनी संदीप जोशी यांना समर्थन दिले. बंजारा समाज बांधवांच्या सभेमध्ये समाजाचे नायक व समस्त पदाधिका-यांनी पूर्ण समर्थन दर्शविले.
यावेळी बोलताना खासदार डॉ.विकास महात्मे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व महाविकास आघाडी सरकारने थांबवून ठेवलेल्या विकास प्रकल्पांचा पाढा वाचला. धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर टाउन हॉल निर्मितीचा मुद्दा प्रलंबित आहे. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ कोटी ८० लक्ष रूपयांचे पत्र दिले होते. याशिवाय नागपूर शहरात धनगर समाजाची संख्या अधिक असूनही शहरात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नाही. शहरात अहिल्यादेवी होळकर यांचे म्यूरल व्हावे, या दोन्ही प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी खासदार डॉ.विकास महात्मे यांनी यावेळी संदीप जोशी यांना केली.
निवडणुकीमुळे लागू असलेली आचार संहिता संपल्यानंतर ३१ डिसेंबरच्या आत समाजाचे टाउन हॉल बाबत मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत समाजाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या म्यूरल करिता वैयक्ति निधीतून १० लक्ष रूपये देण्यात येणार असल्याचे संदीप जोशी यांनी जाहीर केले.
बंजारा समाजाच्या बैठकीत मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आत्माराम चव्हाण, प्रा.वसंत पवार, शालीकराम राठोड, आर.डी.जाधव, श्रीकांत राठोड, हुडकेश्वर येथील सभेमध्ये आमदार टेकचंद सावरकर, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, अजय बुडारे, मनोज लक्षणे, माजी सैनिकांच्या सभेमध्ये कर्नल पुंडलिक सावंत, आर.बी.सिंग, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेविका जयश्री वाडिभस्मे, शिव परिवार सभेमध्ये हेमंतराव काळमेघ, बी.जी.वाघ, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य सूरज जिचकार, डॉ.सलमान अंसारी, बबनराव चौधरी, लक्ष्मीनगर येथील सभेमध्ये देवयानी जोशी, संजय वाधवानी, अजय पाठक यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.