माजी नगरसेवकांने विना परवानगीने आपल्या घरावर लावले मोबाईल टॉवर !




चंद्रपूर : गडचांदूर नगरपरीषद हे ऐनकेन प्रकाराने चर्चेत असते. नुकतेच निलेश ताजणे या माजी नगरसेवकांने नगरपंचायतीच्याअगदी लागून असलेल्या आपल्या इमारतीवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुट्टीच्या दिवशी लावल्याने गडचांदुरांतील त्याच वार्डातील विजय कोंगरे,अब्दुल कयूम,अब्दुल हाफिज, ओमकार सिंग दुराणी,गुलाब राठोड,भाऊराव शेवगावकर, प्रशांत गोखले आदी रहिवाश्यांनी गडचांदूर न.प. ला रितसर तक्रार दिली आहे, त्या तक्रारीचे आता काय होते, याकडे गडचांदूरवासियांचे लक्ष लागले आहे.


मागील सत्रात निलेश ताजणे हे महोदय न.प.मध्ये उपनगराध्यक्ष व गटनेते होते. त्यावेळी निलेश ताजणे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून विजयी झाले होते. या खेपेला पलटी मारत निलेश ताजणे यांनी भाजपकडून उमेदवारी लढवली परंतु त्यांना गडचांदूर वासियांनी धोबीपछाड मारत पलटी केले. ज्यावेळी निलेश ताजणे हे गटनेते व उपनगराध्यक्ष होते त्यावेळेस नगराध्यक्षा म्हणून विजयालक्ष्मी डोहे ह्या कार्यरत होत्या. त्यांची सत्ता असताना मोबाईलचे टॉवर हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याच्या कारणाने त्याविरोधात त्यांनी आपला आवाज ठेवला होता, व गडचांदूरातील त्याच्या कार्यकाळातील दोन मोबाईल टॉवरचे प्रस्ताव आले तेव्हा त्यांनी ते प्रस्ताव धुडकावून लावली. त्यावेळी त्यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घेत टाॅवर लावण्यास विरोध दर्शविला मात्र आता सत्तेत नसल्यामुळे त्यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी आपल्या इमारतीवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभा केला आहे. यावेळी न.प. मध्ये भाजपाचे अरूण डोहे व , रामसेवक मोरे यांच्या रूपाने दोन नगरसेवक निवडून आले आहेत. हे दोन ही नगरसेवकच गडचांदूर न.प. मध्ये विरोधी पक्षांची ठाम भूमिका बजावत आहेत, गडचांदुर शहरातील समस्यांवर सभागृहामध्ये आपला आवाज बुलंद करण्यात अरुण डोहे हे फारच आक्रमक आहेत. परंतु ज्याला वार्डवासियांनी नाकारले, ते भाजपचे निलेश ताजने आपल्या घरावर कोणतीही शासकीय परवानगी न घेता पूर्वी आरोग्यासाठी धोकादायक असणारे मोबाईल टावर आता आपल्या घरावर "सब-कुछ चलता है" या तोऱ्यात उभारत आहेत, त्यावर तक्रारी सुद्धा होऊन राहिले आहेत तेव्हा भाजपच्या गडचांदुर तालुका अध्यक्ष सतिश उपलेंचवार व भाजप जिल्हाध्यक्ष यांनी यावर त्वरित पावले उचलायला हवी, अशी मागणी गडचांदूर वासियांनाकडून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचंदुर नगर परिषद निवडणूक आत्ता आत्ताच म्हणजे एक वर्षापूर्वी झाली यावेळी भाजपने संपूर्ण सतरा जागा स्वबळावर लढविल्या होत्या. यातील दोनच जागांवर भाजपला यश प्राप्त करता आले. गडचंदुर नगर परिषदेमध्ये निलेश ताजने यांच्या जागेसाठी भाजपने आपली कसोटी पणाला लावली होती आणि हीच जागा गडचांदूर मध्ये चर्चेचा विषय होता तरीसुद्धा निलेश ताजणे यांना उताने पडावे लागले, हे बहुतेक आता निलेश ताजणे विसरले असतील. स्वतःच्या तोऱ्यात राहणे, जनतेशी संपर्क न ठेवणे ही बाब निवडणुकीत निलेश ताजणे यांना भोवली होती, पक्षाने संपूर्ण जोर लावूनही त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. भाजपाचे पराभूत उमेदवार असलेले निलेश ताजने गैरकृत्य करून गडचांदूर मध्ये भाजपला "उताणे" पाडतील यात शंका नाही, यापूर्वीही त्यांनी असे अनेक उपद्व्याप केले आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी यावर त्वरित काही उपाययोजना करावी अशी मागणी गडचांदूरवासी करीत आहे.