चंद्रपूर जिल्ह्यात प्लाझ्मा डोनेशन सेंटर प्रगतिपथावर



संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. या अदृश्य पण अत्यंत भीषण विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण जगातील चिकित्सक शर्थिने प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना लवकर बरे वाटावे म्हणून अगोदर कोरोना होउन बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाज्मा देण्यात देण्यात येतो. हा प्लाज्मा सहज उपलब्ध होऊन इतरांचे जीव वाचावे यासाठी महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरसह राज्यातील एकूण सतरा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयामध्ये 29 जून 2020 पासून प्लाज्मा डोनेशन बँक प्रारंभ केलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण विभागात प्लाज्मा डोनेशन बँक प्रारंभ करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 29 जून 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे. याप्रसंगी त्यांनी कोव्हीडमुक्त झालेल्या नागरिकांना कन्व्हलसंट प्लाज्मा दान करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने समोर येण्याचे आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान चळवळीने चांगला जम बसविलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्त संक्रमण विभागाची चमु डॉ. अनंत हजारे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिरांसाठी नेहमी तत्पर असते. मग रक्त प्लाज्मा संक्रमणाच्या कार्यात ही चमू मागे कशी राहील. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान व प्लाज्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवेतील ज्या कोरोना योध्दांना कोरोना झालेला होता, अशा लोकांनी स्वतः पुढे येउन प्लाज्मा दान केले, आणि आता रक्तदान चळवळ प्रमाणे प्लाज्मा दान चळवळही चंद्रपूर जिल्ह्यात रुजू लागलेली आहे.
15 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सर्वप्रथम प्लाज्मा दान करणाऱ्या तीन दानदात्यांचा सत्कार करण्यात आला. सुहानी चावरे, आशिष बोथरा आणि श्यामदर्शन मेश्राम हे तीन प्रथम प्लाज्मा दाते आहेत.
प्लाज्मा बँक मध्ये दान करण्यात आलेल्या प्लाज्मा मायनस 80 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये पाच वर्षापर्यंत सुरक्षित ठेवता येईल. या बँक मध्ये ए पॉझिटिव्ह रक्तगटाचा 4, बी पॉझिटिव्हच्या 16, ओ पॉझिटिवच्या 4, ओ निगेटिव्हच्या 2आणि एबी पॉझिटिवच्या 2 अशा एकूण 28 बॉटल कन्व्हलसंट प्लाज्मा संग्रहित करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत तरी कोणत्याही गंभीर कोरोना रुग्णांना प्लाज्मा देण्यात आलेला नाही.
      
रुग्णाला त्यांच्या चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार प्लाज्मा देण्यात येतो. प्लाज्मा देण्याची चिकित्सा अत्यंत सुरक्षित प्रणाली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याचा धोका नाही. प्लाज्मा दिल्यामुळे रोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढून तो लवकर बरा होतो. अशी माहिती प्लाज्मा बँकेचे प्रमुख डॉ. अनंत हजारे यांनी दिली आहे.
कोण करू शकतो प्लाजमा दान दान
    कोव्हीड बाधित होऊन स्वस्थ झाल्यानंतर 28 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेली व्यक्ती  प्लाज्मा दान करू दान शकते.  सदर व्यक्तीला बि.पी., शुगर, हृदयरोग आदि गंभीर आजार नसावे. त्याचे वय 18 ते 60 च्या दरम्यान व वजन 60 किलो पेक्षा अधिक असावे. हिमोग्लोबीन 12.50 टक्के पेक्षा अधिक असावे.
        प्लाज्मा दिल्यानंतर 24 ते 72 तासाच्या आत दानदाताच्या रक्तामध्ये प्लाज्मा भरून निघतो. म्हणून प्लाज्मा दर पंधरा दिवसांनी अर्थात महिन्यातून दोन वेळा दान करता येतो. प्लाज्मा दान केल्याने कोणतीही शारीरिक कमजोरी येत नाही किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी होत नाही.
मानवी रक्तामध्ये 55 टक्क्यापर्यंत प्लाज्मा असतो. प्लाज्मा संकलन करणाऱ्या यंत्राद्वारे दानदाताच्या शरीरातून रक्त काढून त्या रक्ताचे पृथकरण केल्या जाते. रक्तातुन प्लाज्मा वेगळा होऊन संग्रहित होतो. बाकीचे रक्त दात्याच्या शरीरात परत चढविण्यात येते. त्यामुळे त्याला रक्ताची कमी राहत नाही.
     प्लाज्मा दान केल्याने एकावेळी दोन रोग्यांचे प्राण वाचविता येतात. म्हणून कोरोना होऊन स्वस्थ झालेल्या लोकांनी प्लाज्मा दान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे आणि महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या www.mahasbtc.org या संकेतस्थळावर plasma.mahasbtc.org या लिंक वर आपल्या नावाची नोंद करावी आणि ज्या कोव्हीड बाधित रुग्णांना प्लाज्माची गरज असेल ते देखील या संकेतस्थळावर नोंद करू शकतात. नोंद झाल्यावर गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्लाज्मा दात्याविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी, असे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदे मार्फत कळविण्यात आलेले आहे.
          चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय महाविद्यालयच्या या प्लाज्मा बँकेची वाटचाल अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे व त्यांची चमू यांच्या मार्गदर्शनात प्रगती पथावर आहे. इच्छुक दानदात्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून प्लाज्मा दान करून प्राणदान करावे.
- मुरली मनोहर व्यास