रेस्क्यु सेंटर चा प्रस्ताव तयार करण्यास वन्यजीव मंडळाची मंजुरी



चंद्रपूरः जिल्हयात रेस्क्यु सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याबाबत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असुन, त्यात घेण्यात आलेल्या ठरावानुसार सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे असे नमुद केले असल्याने, सदर प्रस्ताव ताडोबा व्यवस्थापनाने त्वरीत तयार करण्याची मागणी नुकतेच एका निवेदनातुन बंडु धोतरे यांनी केली आहे.
जिल्हयातील वाढतील वाघ व इतर वन्यप्राण्याची संख्या व मानव वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता येथील तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्र (TTC) चा दर्जा वाढवुन ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करणेबाबतचे निवेदन राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा मानद वन्यजिव रक्षक बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर यांनी मा. मुख्यमंत्री, मा. वनमंत्री, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना देण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हयातील वाघ व इतर वन्यप्राणी यांची वाढलेली संख्या व जिल्हयातील वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता जिल्हयातील टिटिसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.

यांसदर्भात 7 डिसेंबर 2020 रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथिल मानव-वन्यप्राणी संघर्ष यावर चर्चेदरम्यान बंडु धोतरे यांनी वन्यजीव मंडळापुढे चंद्रपूर जिल्हातील टिटीसी चा दर्जा वाढवुन रेस्क्यु सेंटर तयार करण्याची गरज स्पष्ट केली. चंद्रपूर जिल्हयातील वाढलेली वाघ-बिबटची संख्या, मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये जेरबंद करण्यात येणारे वाघ-बिबट, जखमी वन्यप्राणी यांची संख्या यात वाढ होत आहे. त्याकरीता नागपुर गोरेवाडा रेस्क्यु सेंटर वर निर्भर राहावे लागत आहे, आणि गोरवाडा प्राणीसंग्रहालयची प्राणी ठेवण्याची क्षमता सुध्दा संपलेली आहे. अश्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असल्याने वेळेची गरज लक्षात घेता चंद्रपूर टिटीसी चा दर्जा वाढवून, अधिक क्षमतेचे ‘रेस्क्यु सेंटर’ तयार करण्यात आल्यास भविष्यातील अनेक अडचणी दूर करता येईल ही बाब लक्षात घेउन राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हाची गरज ओळखुन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चंद्रपूर येथे रेस्क्यु सेंटर चा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

या बैठकीचे इतीवृत्त प्राप्त झाले असुन त्यात नमुद केल्यानुसार ‘‘मानव-वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या क्षेत्रातील उदा. चंद्रपूर येथील ट्रांजीट ट्रिटमेंट सेंटरचे ‘वन्यजीव बचाव केंद्रात’ (रेस्क्यु सेंटर) रूपांतरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण यांचेकडे पाठविण्यात यावे’’ असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार सदर राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील प्रस्तावीत रेस्क्यु संेटरचा प्रस्ताव तयार करून, प्रस्ताव पुढील मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरण कडे पाठविण्यात यावे या मागणीचे निवेदन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांचेकडे बंडु धोतरे यांनी केली आहे.