मी बारामतीचा नाद सोडला नाही-महादेव जानकर



मी बारामतीचा नाद सोडला नाही-महादेव जानकर
करमाळा (सोलापूर) : मध्यंतरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कारखान्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. परवा जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उदघाटनावेळीही आम्ही एका व्यासपीठावर होते. याचा अर्थ मी माझी भूमिका सोडलेली नाही. माझा पक्ष एनडीएचा घटक पक्ष असून मी एनडीए सोबतच आहे.

मी पवारसाहेबांना भेटलो, आम्ही एका व्यासपीठावर आलो म्हणजे मी बारामतीचा नाद सोडलेला नाही. येत्या काळात माझा पक्ष बारामतीसह माढा, परभणी, जालना, हिंगोली हे पाच मतदार संघात लोकसभा सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी सांगितले.

करमाळा येथे पत्रकार कट्टयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रा. वैभव फटांगरे उपस्थित होते. 2009 ला महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात उभे होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र 2019 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

श्री. जानकर म्हणाले, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा मी कुठलेही काम केले नव्हते. तरीही लोकांनी मला भरभरून मते दिली. मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेथील लोकांनी माझ्यावर प्रेम केले. पवारसाहेब आम्ही एका व्यासपीठावर आलो म्हणून मी बारामतीचा नाद सोडला असे होत नाही. मी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हा एकाही ग्रामपंचायतीत माझा सरपंच देखील नव्हता. आज सत्तावीस राज्यांत माझा पक्ष अस्तित्वात असून चार राज्यांत माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे.


प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा संदर्भ लावत असतो. तसाच संदर्भ माझ्या व पवारसाहेबांच्या भेटीचा आणि एका व्यासपीठावर येण्याचा लावला जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नसून मी आज मोदी साहेबांबरोबर आहे भाजपबरोबर आहे. माझा राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, हिंगोली, जालना, परभणी या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दाखवून देणार आहे.