अनेकांच्या चेहऱ्यांवर फुलविले हास्य
डॉ. चेतन खुटेमाटे यांचे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले आहेत. गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. अनेकांकडे पैशाची अडचण असल्यास मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर आस्थेने विचारपूस करीत गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या हातात पैसेसुद्धा घालतात. यासोबतच गावखेड्यात ते नियमितपणे आरोग्य शिबिरे घेत असतात. आपल्या ज्ञानाचा फायदा गावखेड्यातील नागरिकांना व्हावा, एवढीच त्यांची इच्छा असते. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणाèया अनेक युवकांना त्यांनी आजपर्यंत मदतीचा हात दिला. यातून अनेक युवक आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करू शकली. केवळ सेवाभाव म्हणून काम करणारे डॉ. खुटेमाटे कायम प्रसिद्धीपासून दूर पळतात, हा त्यांचा मोठेपणा आहे.
चंद्रपूर, ता. १० : विनापरवानगी कोरोनाबाधितांवर उपचार.रेमडेसिव्हीरचा काळाबाजार. रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होतात. डॉक्टरातील ''देवमाणूस'' अद्यापही जागा आहे, असा सुखद धक्का देतात. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे. पैशासाठी मृतदेहांनाही कुलूप बंद करणाऱ्या डॉक्टरांच्या गर्दी डॉ. खुटेमाटेंनी वेगळा आदर्श समोर ठेवला.
त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाइकांना उपचाराची पूर्ण रक्कम परत केली. ही पहिलीच वेळ नाही, नेत्रतज्ज्ञ असलेले खुटेमाटे अनेक गरजवंताच्या शस्त्रक्रिया एक पैसाही न घेता नेहमीच करून देतात.
डॉ. चेतन खुटेमाटे शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:च्या नेत्र रुग्णालयाला चक्क कोविड हॉस्पिटल बनविले. डॉ. सचिन धगडी हे येथे सेवा देत आहेत. कोरोना रुग्ण बरा झाला किंवा मृत झाला, तरी रुग्णालयाचे बिल घेतलेच जाते. नातेवाईकही आप्त गेल्याचे दु:ख पचवत दवाखान्याचे बिल देत असतात. परंतु, काही डॉक्टर याला अपवाद ठरतात. त्यापैकी एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे आहेत. आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या छोटा नागपूर येथील एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती डॉ. खुटेमाटेंच्या कानावर आली. सामाजिक पिंड असलेल्या डॉ. खुटेमाटे यांनी कोणताही विचार न करता त्या रुग्णाचे संपूर्ण उपचाराचा खर्च माफ केला. एवढेच नाही, तर भरतीपूर्व घेतलेली रक्कमही नातेवाइकांना परत केली. डॉ. खुटेमाटेंच्या या निर्णयाला त्यांचे सहकारी डॉ. सचिन धगडी यांनीही क्षणात होकार दिला. डॉक्टर यांच्या या कृतीपुढे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांसमोर केवळ हात जोडण्याव्यतिरिक्त काहीच नव्हते.
या प्रसंगाने रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. खुटेमाटे यांच्या मनातील तळमळ, गोरगरीबांविषयीची असलेली आस्था जवळून बघता आली. डॉ. चेतन खुटेमाटे यांच्याप्रमाणेच शहरातील अन्य डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. या संकटकाळात सर्वांनी सेवाभावी भाव दाखवावा. जेणेकरून डॉक्टरांविषयीचे तयार झालेले गैरसमज दूर होऊन पुन्हा डॉक्टर हेच देवदूत आहेत, हे कुणीही नाकारू शकणार नाही, एवढे मात्र निश्चित!