आरोग्य विभाग भरती परीक्षा गोंधळ: विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ आरोग्य मंत्री राजेश टोपे



मुंबई :- आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी होत असलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आल्या, तर काही ठिकाणी उशिरा मिळाल्या अशी उमेदवारांची तक्रार होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. या उमेदवारांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिकांचा बॉक्स न उघडल्याने...

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वृत्तवाहिन्यांसमोर परीक्षेच्या गोंधळाबाबतचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'नाशिक, पुणे केद्रांवर प्रश्नपत्रिका ज्या बॉक्समधून देण्यात आल्या होत्या, त्या डिजीटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. हा दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना तितका अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात येणार आहे.'


काय होता गोंधळ?

पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर पेपरची वेळ झाली तरी प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या, अशा तक्रारी उमेदवारांनी केल्या. प्रश्नपत्रिका तर नाहीतच शिवाय पर्यवेक्षकही उपस्थित नव्हते, अशी माहिती आहे. त्यामुळे तेथे विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिकमध्ये गिरणारे केंद्रावर ४५० उमेदवार परीक्षा देणार असताना प्रश्नपत्रिका मात्र ३०० आल्याने एकच गोंधळ उडाला होता.