नवरगाव - मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत 'जनजाति लोककला ऐंव बोली विकास अकादमी' या संस्थेच्या वतीने डिसेंबर 25 ते 27 दरम्यान 'विमुक्त तथा घुमंतु जातियों की शिल्पा और कला परंपरा'या विषयावर मध्यप्रदेश जनजाति संग्रहालय श्यामला हिल्स येथे तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील विविध राज्यातील 34 शोधनिबंधाची निवड यात झालेली होती. त्यात श्री ज्ञानेश महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांच्या "नवरगांव के कुरमार समुदाय की कंबल -कला 'या विषयावरील शोध निबंधाची निवड झाली होती. त्यांनी तिसऱ्या सत्रामध्ये नवरगावच्या कुरमार (धनगर) समुदायाच्या पारंपरिक घोंगडी विणण्याच्या कलेवर विस्तृत शोधनिबंध सादर केला. मध्यप्रदेश येथील लोककलेच्या अभ्यासकांनी शोधनिबंध सादर झाल्यानंतर 'मध्य प्रदेश सरकारचा लोकरंग 'या सांस्कृतिक उत्सवात 'जनजाति लोक कला एवं बोली विकास अकादमीचे ' संचालक डॉ.धर्मेंद्र पारे यांनी कुरमार समुदायाला प्रात्यक्षिकासाठी अतिमहत्त्वाच्या निवडक पाच प्रदर्शनीत निमंत्रित केले.
येत्या 26 जानेवारीपासून सुरू होणारा हा उत्सव 30 जानेवारीपर्यंत श्यामलाहिल्स येथील मध्यप्रदेश सरकारच्या जनजाति संग्रहालय भोपाळ या भव्यदिव्य सांस्कृतिक संग्रहालयात आयोजित करण्यात आलेला आहे. भोपाळ मध्ये दरवर्षी या उत्सवात निवडक लोककला सादर केल्या जातात. संपूर्ण मध्य प्रदेश मधून या पाच दिवसात जवळपास वीस हजार लोक या उत्सवाला भेटी देतात. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते या लोक रंगाचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील दुर्लक्षित झालेल्या कुरमार समुदायाची ही पारंपारिक कला मागील शेकडो वर्षापासून सातत्याने सुरू आहे. लोककलेच्या अभ्यासात ही कला महाराष्ट्रात दुर्लक्षिल्या गेली. पण कुरमार समुदायाच्या घोंगडीला अखेर मध्यप्रदेश सरकारने न्याय दिला असे म्हणायला यानिमित्ताने हरकत नाही.
या उत्सवात नवरगाव येथील सुकरुजी सिंगिरवार,अशोक मुद्रिवार, मंदाबाई कंचनवार,निर्मलाबाई मुद्रीवार,रोहिदास अल्लीवर,ऋषी अल्लीवार,शेखर कंचनवार,नंदू अन्नावार हे कलावंत लोकरंग मध्ये सहभागी होणार आहे.