मुल:- खेडी गोंडपिपरी या राज्य महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या काम करण्याच्या अवधी निघून गेला तरीही या राज्य महामार्गाचे काम अद्याप रखडलेले होते यासंबंधात सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. याविरोधात नुकतेच रा.स.प. (राष्ट्रीय समाज पक्ष) च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी खेडी-गोंडपिपरी मार्गावर "सदबुध्दी आंदोलन" करण्यात आले. कामात विलंब लावणाऱ्या व अपघातास जबाबदार असणाऱ्या गोंडपिपरी-खेडी मार्गाचे कंत्राटदार व सा.बां. विभागाला सद्बुद्धी प्राप्त होवो. यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहनधारकांना त्यांच्या हिंमतीसाठी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
खेडी ते गोंडपिपरी या रस्त्याच्या नुतनीकरणाचे कंत्राट हैद्राबाद येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यासाठी २१८.२१ करोड रुपयांच्या रोडच्या बांधकामांला मंजुरी देण्यात आली. त्या रोडचे बांधकाम २४ महीण्यात म्हणजे ७३० दिवसात पुर्ण करावयाचे होते. मात्र या कंत्राटदारांनी दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही रोडच्या कामाची सुरुवात केली नाही. नुकताच बांधकाम विभागाने सहा महीण्याचा वाढीव कालावधी दिला आहे. मात्र अजुनही या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही. रासपच्या आंदोलनाच्या धसक्याने दोन दिवसांपूर्वी कंत्राटदारांनी थातूरमातूर या रस्त्याचे कामाला सुरू केले आहे.या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांना अपंगत्व आले आहे तर काहींचा मृत्यु झाला. याच रोडवर पंचायत समिती चे सदस्य मा.संजय पा.मारकवार यांचा अपघातात मृत्यु झाला होता.तरीसुध्दा या रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी कंत्राटदाराला मुहूर्त सापडत नसल्याने अजूनही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे जिवघेणी ठरत असल्याने कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आतापर्यंत अपघाताने मृत्यू पावलेल्या व अपंगत्व आलेल्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.याबाबत अनेकदा बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.मात्र निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे.त्यामुळे कुंभकर्णाची झोप घेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला व कंत्राटदाराला जागे करण्यासाठी जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आले.खेडी ते गोंडपिपरी या राज्य महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला व सार्वजनिक बांधकाम विभागाला सद्बुद्धी मिळवी व कामाला जलदगतीने पुर्ण करावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने सद्बुद्धी आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मा.पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चंद्रपूर, मा. अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले आहे. रासपच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विकास उपरीकर, दिलीप भुमलवार,नितेश म्याकलवार,अनिल पुष्पलवार, संतोष आंबेकर,अमोल लोडेल्लीवार,वाघेश्वर इनमुलवार,शंकर पाटेवार,आशीष कलगडवार,जानुजी मिडपल्लीवार,सुनिल पोटभरे,सचिन येडलावार आदी उपस्थित होते. यावेळी दुचाकीवाहणाने क्षतिग्रस्त झालेले वाहन चालक ओमेश कलगडवार यांनी आपली व्यथा कथन केली. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.