पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांची नितीन भटारकर यांच्या उपोषण मंडपाला भेट



चंद्रपूर :-चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात वाघ आणि बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा जीव गेल्यानंतर येथे आक्रोश सुरू आहे दरम्यान वन विभागाच्या विरोधात नितीन भटारकर यांची आमरण उपोषण सुरू असून, जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी भेट देऊन पाहणी केली.

दुर्गापुर, ऊर्जानगर व लगतच्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला होता. मागील काही महिन्यात झालेल्या या प्राण्याच्या हल्ल्यात या परिसरातील जवळपास ७ ते ८ सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवशी या परिसरातील २ नागरिकांचा या प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला व म्हणून वन विभागाच्या ढिसाळ, नियोजनशुन्य कारभाराच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ अन्यत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार साहेब यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन शासन स्तरावरील ज्या परवानग्या लागेल उपायोजना असेल, त्या तात्काळ राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यापुढे वन विभागाची हयगय खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले. तसेच उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून मी सतत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या गंभीर विषयासंदर्भात आज हिराई गेस्ट हाउस येथे मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, मा. मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, मा. मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर या सर्वांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी मा. पालकमंत्री महोदयांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश भाऊ देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. संदीप भाऊ गड्डमवार, इंटक कामगार संघटनेचे नेते शंकरजी खत्री हे उपस्थित होते.