एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलं आहे. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार आहे.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
विशेष म्हणजे 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले.
दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे यानं न्यायालयात त्याची सुनावणी झाली त्यावेळी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं आणि त्यांनी असं कोणतंही जळीत हत्याकांडाचं कृत्य केलं नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. मात्र सरकारी पक्षानं सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.
हिंगणघाटमधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आज त्या संदर्भात हिंगणघाटच्या न्यायालयात निकाल अपेक्षित होता. मात्र, आजही निकाल लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर ती शिक्षिका शिकवत असलेल्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळं या प्रकरणी निकाल लवकर लागेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, घटनेला दोन वर्ष झाली तरी नराधम आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही. हे दुर्दैवी असल्याचं मत महाविद्यालयातील सहकारी शिक्षक आणि शिक्षिकांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.