अखेर एका युगाचा अंत,९२ व्या वर्षी लतादिदींचा मृत्यु!



देशातील महान गायिका, गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे ९२व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ( Breach Candy Hospital, Mumbai) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली आहे. तसेच, लतादिदींच्या जाण्याने संगीतविश्व, कलाविश्व पोरके झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून आणि दिग्गजांकडून देण्यात येत आहे. (Lata Mangeshkar Passes Away At Mumbai)

तब्बल महिन्याभरापासून सुरु होते उपचार…

दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून (Corona) बऱ्या झाल्या होत्या.तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.


दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा – Ventilator) ठेवले. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली.