चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आज अबुल कलाम आजाद बगीच्या च्या उद्घाटन सोहळ्याला जय्यत तयारी करण्यात आली. त्यानुसार पाहुण्यांची कार्यक्रम पत्रिकाही जाहीर झाली. आज भल्या पहाटे आमदार किशोर जोरगेवार यांनी "मी येणारच" असे फलक शहरभर लावले. राजशिष्टाचारनुसार कार्यक्रम झाला नाही तर आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे रामू तिवारी यांनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज याच बगिच्याला पोलीस संरक्षण देण्यात आले दुपारी बारा वाजल्यापासूनच पोलिसांची कुमक तैनात होती. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. आमदार किशोर जोरगेवार आपल्या गांधी चौक परिसरातील कार्यालयातून सहज दाखल झाले. तत्पूर्वी आझाद बगीचा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि खासदार बाळु भाऊ धानोरकर यांची उपस्थिती होती. तिघांच्या उपस्थितीत रीतसर उद्घाटन देखील झाले.
आणि इतक्यात कुणीतरी एका कार्यकर्त्याने किशोर भाऊ आगे बढो अशी नारेबाजी केली आणि इथूनच भाजप विरुद्ध यंग चांदा ब्रिगेड असा सामना रंगला. यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद प्रवेशव्दाराचे उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सर्वजण सौंदर्यीकरणाची पाहणी करण्यासाठी आत गेले. खंडेश्वर नंदीजवळ धक्काबुक्की ला प्रारंभ झाला आणि तिथून आमदर किशोर जोरगेवार आपल्या समर्थकांसह कार्यक्रम स्थळी पोहचले. घोषणाबाजी करतांना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दुसरीकडे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि खासदार बाळू धानोरकर बगीच्यातील पाहणी करत होते. मात्र थोड्या वेळातच खासदार धानोरकर यांनी बगीचातून काढता पाय घेतला. इकडे सभामंचावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काहीवेळाने आमदार सुधीर मुनगंटीवार सभा मंचाकडे आले. तेव्हा किशोर जोरगेवार यांनी हातात माईक घेऊन भाषणाला सुरुवात केली. त्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि सूत्रसंचालन पद्धतीने कार्यक्रम होऊ द्या, आपला नंबर येते भाषण द्या अशी विनंती केली. मात्र आधीच संतप्त झालेल्या आमदार किशोर जोरगेवार यांनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरुवात केली. तेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली आणि मनातील पूर्ण संताप व्यक्त केला. सुधिर मुनगंटीवार बोलताना म्हणाले, ज्यांनी ज्यांनी या चांगल्या कार्यात आग लावली त्या सर्वांना या बांबुंच्या खाणीतील बांबू दाखविणच असा टोला नाव न घेता आ.जोरगेवार यांना लावला. आयुक्त मोहीते यांनी ही राजकीय आग लावलेली असून, त्यांना मी चंद्रपूर शहरात राहु देणारच नाही अशी शपथ घेत अपमानाचा बदला ही घेणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी मानापमानाचे नाट्यही चांगल्याप्रकारे रंगले. दोन आमदारांमध्ये रंगलेला हा संघर्ष चंद्रपूरकर नागरिक मात्र गमतीने बघत होते. यावेळी उपस्थित नागरिकांना इतर कार्यक्रमापेक्षा दोन आमदारांनी मध्ये झालेली बाचाबाची अधिक मनोरंजक वाटली, हे खरे..