गंगाखेड: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले असून अनेक कार्यकर्ते आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी नेतेमंडळीच्या घराचे उंबरठे झिजवत आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षात आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
आपले राजकीय अस्तित्व पुढे चालत राहावे यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते हे राष्ट्रीय समाज पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले असून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या नगर परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नगर परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील यांची ग्रामीण भागासह शहरातही राजकिय सामाजिक कार्याचा मोठा दबदबा आहे. अशा दिग्गज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश मिळाले आहे. येणाऱ्या काही दिवसात कोण- कोणते दिग्गज नेते मंडळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाची माळ आपल्या गळ्यात घालतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.नुकताच भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशराव रोकडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.या प्रवेशात अनेक दिग्गजांनी प्रवेश घेतल्याने भाजपात मोठी खळबळ माजली आहे.