सांगली : मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ओबीसी आरक्षणाचा पेच कायम आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. (BJP Congress are two sides of same coin OBC reservation gone because of them says Mahadev Jankar)
जानकर म्हणाले, "मी विधानसभेतच सांगितलं होत की भाजपनं ओबीसींशी दगाफटका केला आहे. काँग्रेसनही सत्तर वर्षे तेच केलं आहे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मंडल आयोग आणि ओबीसींबद्दल या दोघांची नियत चांगलं नाही" मी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ओबीसींची जनगणना करण्याचा प्रयत्न करावा. तसेच मोदींनी अंत पाहू नये. केंद्राकडे जर ओबीसींचा डेटा असेल तर त्यांनी तो द्यावा, त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल. एकूणच सर्वच राजकीय पक्षांचा ओबीसी आरक्षणाला पाठिंबा असतानाही घोडं पेंड कुठं खातंय याचा विचार जनतेनं करावा. एवढंच माझं नम्र आवाहन आहे, अशा सडेतोड शब्दांत जानकर यांनी उद्धव ठाकरेंपासून मोदींवरही सडकून टीका केली.
रासप स्वबळावर निवडणूक लढवणार - जानकर
ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रीय पक्ष करण्याच्या दृष्टीनं आम्ही या निवडणुका लढवणार आहे. येत्या काळातील राज्य स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. यासाठी सर्व आघाड्यांवर संघटनात्मक काम सुरु आहे. येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असंही महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.