रायगड:- दि.२२ नोव्हेंबर २०२२, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माजीमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी रायगड जिल्ह्यात दौरा करून सुधागड, खालापूर तालुक्यात अती दुर्गम डोंगर कड्या कपारीतील वाड्या वस्त्यांवर भेट देऊन आदिवासी, धनगर, ठाकूर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना आपल्या समस्या मानून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. शेतात मशागतीच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे कष्ट जवळून अनुभवले. रानोमाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या पालावर भेट देऊन लहान मुलांना शाळेत दाखल करून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे असे सुचवले.
महादेव जानकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला असून त्यांच्या अतिशय साधेपणाची झलक कोकण दौऱ्यातल्या गाठीभेटीने अधोरेखित झाली आहे. महादेव जानकर हे जमिनीवरचा नेता असल्याचा परिचय दुर्गम भागातील नागरिकांना आला आहे. महादेव जानकर यांच्या दौऱ्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यांनी सर्व प्रकारचा लवाजमा बाजूला ठेऊन सर्वसामान्य नागरकांप्रमाणे दुर्गम भागातील नागरिकांच्यात मिळून मिसळून राहिल्याने त्यांचा साधेपणा दुर्गम वाडी वस्तिवरच्या नागरिकांना भावला आहे.
नुकतेच महादेव जानकर यांनी जंगलातून चालत जाऊन दर्यागाव आसानी ठाकूरवाडी येथे आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्यात मिळून मिसळून राहत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातल्या ढेबेवाडी येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शिरवली पासून चालत जाऊन दूर सह्याद्रीच्या डोंगरात वसलेल्या ढेबेवाडी गावात ढेबे कुटुंबीयांकडे दोन दिवस वस्ती करून ढेबेवाडी, वावोशी गावातील रस्त्याची व पाण्याची समस्या जाणून घेतली. बालगोपाळांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. अभ्यासाची प्रेरणा देऊन संस्काराचे धडेही दिले. शाळांनाही भेटी देऊन दुर्गम भागातील शिक्षणाची व्यथा जाणल्या. दरम्यान महादेव जानकर यांनी गारमाळ, जभिवली, वावोशी, परखंदे, गोरठन, हेमडी येथील जननी मंदिराचे दर्शन करून या गावांनाही भेट दिली.
या दौऱ्यात कोकण प्रदेश अध्यक्ष तथा प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, कोकण नेते श्रीकांतदादा भोईर, उत्तर रायगड अध्यक्ष संपतराव ढेबे, रायगड संपर्क प्रमुख संंतोष ढवळे-धनवीकर , रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, खालापूर तालुका रा.स.प. नेते गजाननशेठ चंदने, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, रासप युवक आघाडीचे नेते उमेश पाटील आदी उपस्थित होते.