चंद्रपूर : थर्मल पॉवर स्टेशन (CTPS), भारतातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर असूनही, आता नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे. युनिट ८ आणि ९ मधील ओएस ३ चे कार्यकारी अभियंता इटकलकर यांच्या नेतृत्वाखाली सीटीपीएस आता भाजीपाला विक्री सुरू करणार आहे?
हे प्रकरण अनेक प्रश्न उपस्थित करते. सीटीपीएससारख्या सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन होणे निश्चितच चिंताजनक आहे. या प्रकरणाची त्वरित आणि योग्य चौकशी होणे गरजेचे आहे.
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (सीटीपीएस) आता ऊर्जेपेक्षा भाजीपाल्यावर अधिक भर देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. युनिट ८ आणि ९ मधील कार्यकारी अभियंता इटकलकर यांच्या नेतृत्वाखाली सीटीपीएस कर्मचाऱ्यांची ऊर्जा भाजीपाला उत्पादनात गुंतवली जात आहे.
सूत्रांनुसार, नुकतेच क्लीनींग कामासाठी ठेवण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना इटकलकर यांच्या निवासस्थानाची साफसफाई करण्यासाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर सीटीपीएस प्रशासनात खळबळ उडाली होती. मुख्य अभियंता यांच्याकडून चौकशीची मागणी होत असतानाही इटकलकर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
या कामांचे कंत्राटदार रमेश देशमुख यांच्या कडे आहे.यांनी आपल्या कामातील कामगारांना कोणत्या उद्देशाने या सफाई कामासाठी पाठविले,कामगारांचे गेटपास युनिट ८& ९ चे असतांना वसाहतीत पाठविण्याचे कारण काय असा प्रश्न आता कामगार विचारीत आहेत.याच कंत्राटदाराच्या माध्यमातून दररोज दोन ते तीन कामगारांना भाजीपाला उत्पादनासाठी नियुक्त केले जाते.
युनिट क्रमांक ८&९ मध्ये याच कत्राटदाराच्या कामगारांकडून दररोज दोन ते तिन कामगार भाजीपाला उत्पादन करण्यासाठी कामी लावल्या जाते.भाजीपाल्यात वांगे,गोबी,पालक,सेफूची भाजी व इतर भाजीपाला हेक्टर च्या वर जागेत उत्पादन केले जात आहे.दररोज वेगवेगळ्या कामगारांना या भाजीपाला उत्पादनासाठी कार्यकारी अभियंता इटकलकर यांच्या आदेशानुसार कंत्राटदार पाठवित आहे.
८ व ९ मधील कामे कंत्राटदारांकडून करून घेण्याचे काम कार्यकारी अभियंता इटकलकर यांचेकडे आहे. त्याचाच गैरफायदा घेत कंत्राटी कामगारांना खाजगी कामासाठी वापर करीत आहे. स्वतः: च्या खाजगी कामासाठी सीटीपीएस चे कंत्राटी कामगारांचा वापर कितपत योग्य आहे, याचा तपास करून इटलकर यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
सिटीपीएस: भ्रष्टाचारावर कारवाई, कुंपणच शेत खाणाऱ्यावर काय?
सिटीपीएसमध्ये भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजलेली असल्याचे वारंवार समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमारवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी कंत्राटदार आणि अभ्यागतांना उर्जाभवन मध्ये कामाशिवाय येण्यास बंदी घातली. तसेच निर्मिती क्षेत्रात विविध अभियंता यांना भेटण्यासाठी जाण्याची बंदी घातली.
या निर्णयामुळे भ्रष्टाचारावर काही प्रमाणात अंकुश आल्याचे दिसून येत आहे. परंतु, श्री. कुमारवार यांच्याच कार्यकाळात अश्या प्रकरणाने पुन्हा एकदा सिटीपीएसमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
"कुंपणच शेत खात" असल्याने शेत खाणाऱ्यावर कारवाई होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे सिटीपीएसमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये सिटीपीएस प्रशासनाविषयी नाराजीचे स्वरही ऐकू येत आहेत.
काय घडले?
नुकतेच, ८ आणि ९ युनिटमध्ये सुरू असलेल्या क्लीनींगच्या कामातील कंत्राटी कामगारांना कार्यकारी अभियंता इटकलकर यांच्या निवासी क्वार्टरमध्ये घरगुती कार्यक्रमासाठी साफसफाईसाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची दखल मुख्य अभियंता यांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले.मात्र, इटकलकर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
प्रश्न उपस्थित?
कंत्राटी कामगारांना खाजगी कामासाठी वापरणे कितपत योग्य आहे?
भाजीपाला उत्पादनासाठी कामगारांना का लावले जात आहे?
सीटीपीएसच्या कर्मचाऱ्यांच्या या गैरवापराबाबत काय कारवाई होणार?
काय मागणी ?
इटकलकर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर नियम आणि कायदे बनवले जावेत.