लोकसभा फक्त ट्रेलर विधानसभेत दिसणार पुर्ण फिचर्स

 



देशात लोकसभा निवडणूक २०२४ चे पडघम वाजले आहे.त्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रासप पक्षाने यंदा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू, या मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज झाले असून त्यांनी भाजपसह महायुतीला इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक हा फक्त ट्रेलर असेल, खरा पिक्चर तर विधानसभेत दिसणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकरांनी भाजप आणि महायुतीला दिला आहे. 


लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याचे ९ उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीनुसार माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे चिन्हावर उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. अशातच आता महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा दिला आहे. राज्यातील४८ लोकसभा मतदारसंघात रासपचा दणका बसणार आहे. जो काही धनगर आणि ओबीसी समाज आमच्यामुळे भाजपसोबत होता, तो आता भाजपकडे पाठ फिरवताना दिसेल. लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल”, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.


“काही काळापूर्वी भाजपने आम्हाला मंत्रिपद दिला होता. त्याबदल्यात आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते वळवून परत केला. मात्र, भाजपने आमचा आमदार फोडला. आम्हाला लोकसभेची जागा नाकारण्यात आली. त्यामुळे शरद पवारांनी आम्हाला एक जागा दिला असून, शरद पवार, इंडिया आघाडी,राष्ट्रीय समाज पक्ष मिळून महाराष्ट्राची शेती फुलवणार आहे. 


भाजप किंवा काँग्रेसने भारत स्वतंत्र झाल्यापासून आजवर कधीही धनगर समाजाला लोकसभेत पाठवले नव्हते. मात्र, शरद पवारांनी पहिल्यांदा धनगर समाजाला ही संधी दिल्याने राज्यातला धनगर समाज शरद पवार यांना धन्यवाद देत आहे. आमच्यासाठी जे भाजपने केले होते, त्याची आम्ही परतफेड केली असून आता आघाडीसोबत आम्ही असल्याने आमचा फायदा आघाडीला नक्कीच होईल ”, अशा शब्दांत भाजपला इशारा देत महादेव जानकर यांनी महायुतीतून काढता पाय घेतला.


राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाचे मतदान आहे. परभणी, सांगली आणि माढा लोकसभा जागेवर मागणी करूनही भाजपने आम्हाला एकही जागा न दिल्याने आम्ही आता महाविकास आघाडीत सामील झाल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.


तसेच, माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये निवडणूक लढविली, तेव्हा आपण नवखे असूनही लाखभर मते मिळविली होती. आता आमचा पक्ष संघटना आणि समाज यांनी मनावर घेतले आहे. आता माढ्यातून २ लाखांच्या फरकाने रणजित निंबाळकर यांचा पराभव करणार असा दावाही जानकर यांनी केला आहे. 



शिवाय, माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार मोहिते पाटील किंवा रामराजे निंबाळकर यांच्याकडे देतील असे राज्याला वाटत असताना शरद पवार यांनी रासप वर विश्वास दाखवला. आता याचा फायदा आघाडीला राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात दिसेल असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केले आहे.