चंद्रपुर दि. ३० सप्टेंबर
ओबीसी प्रवर्गातील आपल्या उन्नतीपासुन दुर असलेल्या सोनार समाजाची अनेक वर्षापासुनची मागणी अखेर पुर्ण झाली असुन महाराष्ट्रातील युती शासनाने आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे चंद्रपुर जिल्ह्यातील समस्त समाजबांधवांकडुन आनंद व्यक्त केल्या जात असुन राज्यशासनाचे आभार मानल्या जात आहे .
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोटजातीत विखुरल्या गेलेला सोनार समाज हा सोन्याचांदीचे दागीणे व कलाकुसरी बनविण्यासाठी प्रामुख्याने ओळखल्या जातो. या धंद्यावरच समाजातील कुटुंबाचा प्रपंच चालत आलेला आहे. शक्यतो सोनार समाजातील व्यक्ती शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन वंशपरंपरागत आपल्याच व्यवसायात लक्ष देत आलेला आहे. पण मागील काही वर्षात सोनारी व्यवसायात इतर समाजाच्या धनाढ्य लोकांनी शिरकाव करुन छोट्या व्यावसायिकांना अक्षरश: रस्त्यावर आणले आहे. व यामुळे अनेक सोनार व्यावसायिक या धनाढ्य लोकांच्या मोठ्या दुकानात मजुरीचे कामावर लागले आहेत .
यामुळे समाजात आर्थिक दुर्बल घटकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सोनार समाजासाठी शासनाने महामंडळ स्थापन करुन त्याद्वारे व्यावसायिक शिक्षणासोबतच शैक्षणिक प्रगतीसाठी सहाय्य करावे अशी मागणी सोनार समाजाच्या महाराष्ट्रातील विविध संघटनांकडुन अनेक वर्षापासुन शासनाला केल्या जात होती . याची दखल घेत आज राज्य शासनाने कॅबीनेट बैठकीत सोनार समाजाचे आराध्य दैवत व हरीहर ऐक्याचे निर्माते संतश्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या सोनार समाजाला न्याय दिल्याची भावना समाजबांधव व्यक्त करीत आहेत .
सोनार समाजासाठी महामंडळ स्थापन केल्याबद्दल चंद्रपुर सोनार समाज बहुउद्देशिय संस्था जिल्हा चंद्रपूर व जिल्ह्यातील समाजबांधवांतर्फे राज्याचे मुख्यमंत्री मान. एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री मान. देवेन्द्रजी फडणवीस व मान. अजितजी पवार , राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सोनार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चावरे , सचिव गजानन उरकुडे , कोषाध्यक्ष सुमेध कासुलकर ,माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. राधाताई सरोदे , शहर अध्यक्षा सौ. किर्तीताई काळे , समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी लुथडे , प्रविणजी जुमडे , गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या सौ. किरणताई गजपुरे यांच्यासह समाजाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी अभिनंदन करीत आभार मानले आहे .