चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. भाजपने 2 जागी तर काँग्रेस ने 3 जागी उमेदवार जाहीर केले. मात्र, उर्वरित जागी उमेदवार जाहीर करण्यासाठी मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अनेकांना अद्याप अधिकृत पक्षाकडून तिकीट मिळाली नाही, मात्र, काही उमेदवारांनी आपल्याला अधिकृत तिकीट मिळाल्याचा भास दाखवून मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया पोस्ट सुरू केलेले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या प्रतिमेविषयी शंका कुशंका देखील व्यक्त होऊ लागली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेला महाराष्ट्र भरामध्ये मतदान होणार आहे त्यासाठी 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. म्हणजेच अवघ्या 3 दिवसात उमेदवारी जाहीर करून प्रचाराला लागण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपने बल्लारपूर तेथून सुधीर मुनगंटीवार यांना तर चिमूर येथे बंटी भांगडीया यांना पुन्हा उमेदवारी दिली. काँग्रेसने चिमूर येथे सतीश वारजुकर यांना, ब्रम्हपुरी येथे विजय वडेट्टीवार, राजुरा येथे सुभाष धोटे यांना पुन्हा संधी दिली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदार संघात मात्र अद्यापही घोषणा नाही. किशोर जोरगेवार कधी भाजप, कधी शिवसेना शिंदे, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढू, असा घालमेल आहे. यातच शुक्रवारी जोरगेवार यांना भाजप कडून तिकीट देण्यात येऊ यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट दिल्ली गाठली. तिन्ही पक्षातून अंतर्गत विरोध होत असल्याने त्यांना पुन्हा अपक्ष लढावे लागणार आहे.
भाजपकडून आता ब्रिजभूषन पाजारे यांना तिकीट देण्यात यावी, असा आग्रह मुनगंटीवार यांनी धरला आहे . इथे काँग्रेस कडून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. यात माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांचा पत्ता कट झाल्याने प्रवीण पडवेकर रांगेत उभे आहेत. पण, महायुतीकडून कोण, हा प्रश्न कायम आहेत. अधिकृत कुठलीही यादी जाहीर झाली नसली तरी आज संध्याकाळ पासूनच बल्लारपूर संतोष रावत, चंद्रपूर प्रवीण पडवेकर आणि वरोरा प्रवीण काकडे यांचे पोस्ट आणि पोस्टर्स व्हायरल व्हायला लागले.
सर्वात बलाढ्य बल्लारपूर मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांना लढा देण्यासाठी काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. कधीही ध्यानीमनी नसताना हे नाव दिल्लीस्थानी पक्ष श्रेष्ठीच्या बैठकीत निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. हे नाव नेमके कोणते, लवकरच समोर येईल आणि आता धनाढ्य ठेकेदार उमेदवारऐवजी स्वच्छ प्रतिमेच्या आणि मुनगंटीवार यांना सहज आव्हान देऊ शकणाऱ्या नावाला होकार मिळण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे ही जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गीऱ्हे यांना मिळाली असून 29 तारखेला अखेरच्या क्षणी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी पोस्टर जारी केला आहे, पुन्हा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संभ्रम निर्माण झाले आहे.
वरोरा मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून उमेदवारी घोषित करण्यात आली नाही. काँग्रेसकडून अनिल धानोरकर आणि प्रवीण काकडे यांची नावे चर्चेत आहेत. प्रवीण काकडे यांनी ताईच्या आग्रहाखातर अर्ज भरला. पण, भाजपकडून कोण, असा प्रश्न कायम आहे.