चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये chandrapur tharmal Power अनेक प्रशासनिक आणि कर्मचारी व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न उभे राहत आहेत. या मुद्द्यांमध्ये विशेषतः बदल्या आणि नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदली झाली असतानाही त्यांना महत्त्वाच्या खात्यावर ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सिव्हिल विभागात, बदल्या होऊनही संबंधित अधिकाऱ्यांना सिव्हिल विभागातच ठेवण्यात येत आहे.
शासनाचे धोरणानुसार, किमान तीन वर्षांनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली होणे अपेक्षित असते, मात्र चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन यात अपवाद ठरत आहे. बहुतांश अधिकारी चंद्रपूर सोडून जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे यांचे नाव या संदर्भात समोर येत आहे. बोवाडे गेल्या १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी, एकाच पदावर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाची विशेष मेहरबानी असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे निविदा काढणे आणि मंजूर करवून घेण्यासारखी महत्त्वाची कामे सोपवण्यात आलेली आहेत.
बोवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध सुविधांचा पुरवठा करून आपली बदली रोखली असल्याचा आरोपही केला जात आहे. प्रशासनाने त्यांची बदली केली असली तरी त्यांना प्रत्यक्षात कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. आतापर्यंत सर्व मुख्य अभियंते बोवाडे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते, त्यामुळे त्यांच्या बदलीला वारंवार विरोध होत असल्याचा आरोपही आहे.
बोवाडे यांच्यावर चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय मौर्य क्रांती सेनेचे अध्यक्ष संजय कन्नावार यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी केंद्रीय सतर्कता आयोग, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), तसेच चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बोवाडे यांनी काढलेल्या निविदांची तपासणी करणे, तसेच त्यांच्या चल-अचल संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.