बनावट कागदपत्रे सादर करून लाटला पुरस्कार




गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. धर्मराज काळे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून सहाय्यक शिक्षक पदासाठी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळवल्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करत हा गंभीर आरोप केला आहे.


श्री. काळे हे जुलै 2021 पासून सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी ते उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांनी सहायक शिक्षक पदावर कधीही काम केलेले नाही. तरीसुद्धा, त्यांनी सहाय्यक शिक्षक पदासाठी दिला जाणारा हा महत्त्वपूर्ण पुरस्कार घेतला आहे.


महाराष्ट्र शासनाने शा.नि.क्र.प्र.क्र.47, दि. 02 सप्टेंबर 2024 रोजी श्री. काळे यांना सहायक शिक्षक पदासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार जाहीर केला होता. परंतु, शासकीय अटी व निकषांच्या आधारे तपासलेल्या दस्तावेजांमध्ये श्री. काळे यांनी सादर केलेले पुरावे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


तक्रारीनुसार, श्री. काळे यांना त्यांचे व्यवस्थापन किंवा शाळेच्या समितीकडून कोणत्याही प्रकारचे ठराव देण्यात आलेले नाहीत. डिसेंबर 2023 पूर्वीच्या त्यांच्या कर्तव्यकाळात त्यांनी कोणतेही शैक्षणिक ग्रंथ, प्रबंध, अथवा शैक्षणिक नवप्रकल्प सादर केलेले नाहीत, तसेच शैक्षणिक कार्यासाठी कोणत्याही डिजिटल माध्यमांचा (जसे की पोर्टल, अॅप, वेबसाईट, यूट्यूब इत्यादी) वापर केल्याचे दाखले मिळालेले नाहीत. या कारणांमुळे, त्यांना हा पुरस्कार कोणत्या आधारावर देण्यात आला याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


धर्मराज काळे हे ऑक्टोबर 2024 अखेर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे, त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच, सेवानिवृत्तीचे सर्व फायदे थांबवण्यात यावेत, अन्यथा अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


सदर प्रकरण तपासून सांगणार... आनंद अडबाले अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर

क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांना मिळाले असून अमोल मेश्राम यांनी या पुरस्काराबाबत माहीतीचा अधिकार अर्ज टाकलेला आहे.नियमानुसार योग्य कालावधीत माहीती देण्यात येईल.संस्था/ व्यवस्थापन समिती कडून ठराव देण्यात आले किंवा नाही हे तपासून सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.