मुंबई :-२०२४ महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून एक्झिट घेतल्याची घोषणा महादेव जानकर यांनी केल्यानंतर, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ताकतीने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाची ईशान्य मुंबई जिल्ह्यात घाटकोपर येथे पत्रकार परिषद पार पडली. मुंबई रासपाचे अध्यक्ष विठ्ठल यमकर यांनी सर्वच्या सर्व 36 विधानसभा मतदारसंघात रासपचे उमेदवार लढणार आहेत. मुंबईतील प्रस्थापित पक्षांची राजकीय मक्तेदारी मोडीत काढू, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज अंधेरीतल्या कंट्री क्लब सभागृहात फिल्म इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींनी महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. अभिनेत्री मेहक चौधरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रासपात प्रवेश केला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मंचावर नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गर्दी असते, आज मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या मंचावर सेलिब्रिटी पाहायला मिळाले.
अभिनेत्री मेहक चौधरीना मुंबई प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष पदाची लॉटरी लागली. मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मेहेक चौधरींना निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार असल्याचे, सूतोवाच पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.२०१९ मध्ये अभिनेता संजय दत्त यांनीसुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचे गुणगान गात प्रवेश केला होता.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, आपण शेतकऱ्याचा मुलगा असून, या देशाचा पंतप्रधान होण्याचे ध्येय ठेवले आहे. आपणाला मुंबईचे राजकारण करायचे नसून दिल्लीचे राजकारण करायचा आहे. यावेळी मंचावर उत्तर भारतीय आघाडीचे संजय उपाध्याय, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, महाराष्ट्र राज्य खजिनदार सुदामशेठ जरग, महाराष्ट्र प्रदेश महासचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश महासचिव संतोष ढवळे धनवीकर, शरद दडस, मुंबई प्रदेश सचिव इक्बाल अन्सारी आदी उपस्थित होते.