चंद्रपूर: चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन (सीटीपीएस) मधील कामकाज आणि प्रशासनाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, सध्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून वादंग सुरू आहे. मागील १० वर्षांपासून अनेक कर्मचारी आणि अधिकारी एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे हे जवळपास १५ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असून, त्यांच्या बदल्यांबाबत सीटीपीएसच्या यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे.
शासकीय धोरणानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याची तीन वर्षांत एकदा बदली होणे अनिवार्य आहे. मात्र, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये हे धोरण वारंवार डावलले जात असल्याचे दिसते. बोवाडे यांच्यावर निविदा प्रक्रिया आणि अन्य महत्त्वाची कामे सोपवण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना रसद पुरवठा केल्यामुळे त्यांची बदली होत नसल्याची चर्चा आहे.
या प्रकरणावर अखिल भारतीय मौर्य क्रांती सेनेचे अध्यक्ष संजय कन्नावार यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी बोवाडे यांची चौकशी करावी, त्यांच्या निविदा प्रक्रियेची तपासणी करावी आणि चल-अचल संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात दिलेली तक्रार अद्याप प्रलंबित असून, सीटीपीएस प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. प्रशासन या प्रकरणावर कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.