चंद्रपूर (वि.प्रति.)
सध्या पैसे कमविण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची राजकीय नेत्यांची तयारी असल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. गाव-तालुक्यात चालणारे जुगार, सट्टाबाजार, झंडी-मुंडी, कोंबड बाजार, अवैध दारू, रेती तस्करी हे सगळे गैरव्यवसाय अपराधी प्रवृत्तींना हाताशी धरून काही राजकीय नेतेच करीत असल्याचे आतापर्यंतचे वास्तव आहे.
"पैशासाठी काहीपण" करण्यात या निर्लज्ज नेत्यांना काही वावगे वाटत नाही. कायदा व सुरक्षा नियमांना धाब्यावर बसविण्यात त्यांना पोलीस विभागातील बेईमानांचे मिळणारे "अर्थ"पूर्ण सहकार्य हा नेहमी संशोधनाचा विषय राहीला आहे. जिल्ह्यातील काही घटनांमध्ये त्या-त्या क्षेत्रातील राजकीय पुढाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिवती पोलीस स्टेशन च्या हद्दीत जिवती च्या ठाणेदाराच्या आशीर्वादाने सुरु असलेला सध्या असाच एक कोंबड बाजार नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
माणिकगड पहाडाला लागून असलेल्या नानकपठार या गावात हा कोंबड बाजार आठवड्यातून चार दिवस मोठ्या थाटात भरविला जात असून या कोंबड बाजारात कोंबडे लढविणारे शौकीन आपली हौस भागवीतात तर कोंबड बाजाराचे संचालक लाखो रुपयाची माया यातून कमीत आहे. या कोंबड बाजाराला त्याच परिसरातील राजकीय पक्षाचा एका मोठ्या पदावर असलेल्या नेत्याचा आशीर्वाद मिळत असल्यामुळे या गैरप्रकाराकडे जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांचे "देवाण-घेवानितुन" दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या राजकीय पक्षाच्या नेत्याला या गैरप्रकाराला आशीर्वाद आहे तो नेता एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या पदावर कार्यरत असून येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जनतेचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी आपले भाग्य अजमविणार असल्याचे कळते. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूका लागल्या असल्याचा या नेत्याला साक्षात्कार झाल्यामुळे यातून तो नेता "इलेकशन फंड" जमवीत असल्याची आजू-बाजूच्या क्षेत्रातील जनतेत खुमार चर्चा करीत आहे.
या नेत्याच्या गैर प्रकाराने सुरू असलेला "इलेक्शन फंड" सध्या चर्चेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या प्रकाराकडे लक्ष घालावे व या नेत्याच्या मुसक्या आवळाव्या असे मत या परिसरातील नागरिक आता व्यक्त करू लागले आहे. या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर त्वरित आळा घातल्यास नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण होऊ शकतो.