चंद्रपूरच्या तुकूम परिसरातील रोहीत (बियाणी) पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गेटसमोर पानठेला चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या वाहनासाठी पेट्रोल भरण्यासाठी रोहीत पेट्रोल पंपावर भेट दिली. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने १० रुपयांच्या नाण्यांद्वारे (एकूण ९ नाणे) पैसे दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला आणि "आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत, फक्त रोकडच स्वीकारली जाते," असे सांगितले.
ग्राहकाकडे इतर रोख रक्कम नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, रोहीत पेट्रोल पंपावर हा नियम पाळला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची आणि संबंधित पंप बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.