तहसीलदारावर लाचलुचपत विभागाची कारवाई



चंद्रपूर :- तक्रारदार यांनी शेतीमध्ये ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने मशागत करीत असल्यामुळे बल्लारपूरचे तहसीलदार व कवडजई चे तलाठी यांनी माती, मुरूम काढण्याची परवानगी नसल्याचे कारण दाखवून 2 लाखांची मागणी केली, दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.
चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ACB सापळा रचून बल्लारपूर चे तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना ताब्यात घेतले असून तलाठी सचिन रघुनाथ पुकळे याचा शोध सुरु आहे.


तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन बिल्डींग मटेरिअल सप्लायर चा व्यवसाय करतात. तक्रारदार यांची मौजा कवडजई, ता. बल्लारशाह येथे शेती असुन दिनांक 23 मार्च 2025 रोजी 2 ट्रक्टर व 1 जे.सी.बी. च्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती/मुरूम काढून शेताचे लेवलींग चे काम करीत होते .कवडजई साजाचे तलाठी सचिन पुकळे व बल्लारशाह तहसीलचे तहसीलदार अभय गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती/मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले 2 ट्रक्टर व 1 जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता 2 लाख रुपये व तलाठी करीता 20 हजार रू. असे एकुण 2 लाख 20 हजार रूपये लाचेची मागणी केली.


त्याचदिवशी तलाठी पुकळे व तहसीलदार गायकवाड यांनी त‌क्रारदार यांचेकडून 1 लाख 19 हजार 900 रूपये स्विकारले, मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित 1 लाख रू. देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून दि. 26 मार्च रोजी ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.


लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून दिनांक 26 मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान बल्लारपूर तहसीलदार (वर्ग 1) अभय अर्जुन गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनावरून कवडजई साजा चे तलाठी सचिन रघुनाथ पुकळे (वर्ग 3) यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती 90 हजार रुपये मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली.

त्यावरून आज दिनांक 1 एप्रिल रोजी सापळा कारवाई करीता तक्रारदार यांना तहसीलदार अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन तहसीलदार अभय गायकवाड, तहसीलदार याना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने लाप्रवी पथक शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

सदर कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.