पुणे, १५ एप्रिल – महाराष्ट्रात महायुतीची एकहाती सत्ता आल्यापासून विरोधकांमध्ये आक्रमकतेचा अभाव दिसून येत आहे. विरोधकांच्या अशा निष्क्रियतेमुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच, राज्यातील तीन बडे नेते एकत्र येत असून, ते सत्ताधाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर हे तिन्ही नेते १९ एप्रिल रोजी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन करीत आहेत. “खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार!” या घोषणा-पंक्तीखाली होणाऱ्या या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे.
राजू शेट्टी हे शेतकरी संघटनांचे प्रभावशाली नेतृत्व मानले जातात, बच्चू कडू यांची ओळख सामाजिक कार्यासाठी विशेषतः दिव्यांग व निराधारांसाठी काम करणाऱ्या नेत्याप्रमाणे आहे, तर महादेव जानकर हे ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे महत्वाचे नेते आहेत. या तीन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवले असले, तरी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष – शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस – हे केवळ ५० आमदारांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांची भूमिका राजकारणात मागे पडत चालली आहे.
ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नवे आंदोलन उभे करण्याच्या दृष्टिकोनातून ही नवी आघाडी पुढे येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ ही राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड ठरू शकते.