कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून कामगार गंभीर जखमी;



चंद्रपूर, १५ एप्रिल – तिरवंजा गावालगत असलेल्या भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनला कोळसा पोहोचवणाऱ्या कन्व्हेयर बेल्टमध्ये कामगार अडकून गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. निलेश पिंगे असे जखमी कामगाराचे नाव असून, सध्या त्याच्यावर चंद्रपूरच्या मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


प्राप्त माहितीनुसार, क्रशर मशीनमध्ये अडकलेला कोळसा काढण्यासाठी निलेश पिंगे हे कामगार कन्व्हेयर बेल्टवर चढले. अडकलेला कोळसा अचानक मोकळा झाल्याने बेल्ट आपोआप सुरू झाला आणि निलेश यांचा डोक्याचा भाग बेल्टमध्ये अडकला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.


तिरवंजा खाणीतून थर्मल पॉवर स्टेशनपर्यंत कोळसा पोहोचवण्यासाठी कन्व्हेयर बेल्टचा वापर केला जातो. या बेल्टची देखभाल आणि व्यवस्थापन कंत्राटी पद्धतीने होत असून, कंत्राटदार केवळ मोजक्या कामगारांना धोका पत्करून कामावर लावतो. वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी वर्तुळातून होत आहे.


या दुर्घटनेनंतर कामगार सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.