ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या नावाखाली दुर्गापूर पोलिसांनी पायदळ मद्यपीला उचलले




चंद्रपूर (दुर्गापूर) – दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक विचित्र प्रकार घडला. मेजर गेटजवळील एका बिअर बारसमोर दोन पोलिसांनी थेट बारसमोर आपले वाहन लावून, बिअर बारमधून बाहेर पडणाऱ्या एका पायदळ मद्यप्याला ‘दारू पिऊन आहेस, गाडीत बस’ म्हणत पोलिस वाहनात कोंबले. ही संपूर्ण घटना समोर असलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत घडली.


दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ मद्यपान करून वाहन चालविण्यास प्रतिबंधित करते आणि हे कृत्य दंडनीय गुन्हा आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कोणतेही वाहन चालवत नव्हती. तो फक्त रस्त्याने पायदळ घरी जात होता. अशा अवस्थेत त्याला ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या कारणाखाली पोलीस स्टेशनकडे घेऊन जाण्यात आले. यामुळे उपस्थित लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या व्यक्तीला पाहून इतर मद्यपीही घाबरून गेले. 


मेजर गेट परिसरात केवळ ५०० मीटर अंतरातच सुमारे १० पेक्षा अधिक बिअर बार, वाईन शॉप्स आणि देशी दारूचे ठिकाणे आहेत. या ठिकाणी पोलीस वाहनं नेहमी उभी दिसतात. मात्र तपासणी न करता आणि कुठल्याही कायदेशीर कारणाशिवाय, अशाप्रकारे पायदळ चालणाऱ्या मद्यप्याला थेट वाहनात कोंबण्याची ही कृती गंभीर मानली जात आहे.

यावेळी संबंधित व्यक्तीने "दारू पिऊन घरी जात होतो, गाडी नव्हती, तरीही उचलून नेत आहेत, मग दारू प्यायचंच नाही का?" असा सवाल करत आपली नाराजी व्यक्त केली.

या घटनेवरून अनेक तर्क-वितर्क उपस्थित झाले आहेत. संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत नेले की वाटेतच काही ‘व्यवहार’ होऊन सोडून दिले, याची चर्चा परिसरातील मद्यपी करताना दिसले.

स्थानिक नागरीक आणि ग्राहकांच्या मते, पोलीस कारवाई ही कायदेशीर चौकशीच्या आधारेच व्हावी, अन्यथा ही जबरदस्ती मानली जाईल. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी देखील यानंतर जोर धरत आहे.